विनोबा ॲपमधील नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांसाठी शिक्षकांचा सन्मान;
डिजिटल शिक्षणातून गुणवत्तेकडे वाटचाल
नाशिक / प्रतिनिधी :
डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी नाविन्यपूर्ण व प्रभावी शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा नाशिक जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विनोबा ॲपच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण अध्यापन करत विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण अधिक सुलभ व परिणामकारक पोहोचविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी अनिल भामरे, अमोल लामुवेल वानखडे, सविता दिलीप कुशारे, गंगाराम चंदर पाडवी, प्रशांत दगू भोसले, संजयकुमार सुस्लाडे, सोमनाथ महादेव ठोंबरे, प्रीती पवार, राहुल भामरे आणि राहुल करभारी तेलोरे या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सर्व शिक्षकांनी विनोबा ॲपच्या माध्यमातून डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.
सन्मानप्रसंगी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, बदलत्या काळात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिक्षण अधिक दर्जेदार बनविणे ही काळाची गरज आहे. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध होत असून, अशा उपक्रमांमुळे शिक्षणव्यवस्थेला नवी दिशा मिळत आहे.
विनोबा ॲपद्वारे अध्यापनात नाविन्य आणणाऱ्या शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची आवड वाढली असून, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. या सन्मानामुळे इतर शिक्षकांनाही नवकल्पना राबविण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सन्मानित शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले असून, डिजिटल शिक्षणातून गुणवत्तेकडे वाटचाल ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या या शिक्षकांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


