भाजपमध्ये बंडखोरीचा स्फोट; निष्ठावंतांचा रोष टोकाला

0
138
राणेंच्या महायुती घोषणेनंतर भाजपमध्ये भूकंप! अवघ्या काही नाशिक महापौर निवडणुकीपूर्वी नगरसेवक ‘अज्ञातस्थळी’ रवाना
नाशिक महापौर निवडणुकीपूर्वी नगरसेवक ‘अज्ञातस्थळी’ रवाना

भाजपमध्ये बंडखोरीचा स्फोट; निष्ठावंतांचा रोष टोकाला

उमेदवारी नाकारल्याने राज्यभर असंतोष, लातूरसह अनेक शहरांत बंडाचे पडसाद

मुंबई l प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सर्वच पक्षांतील पदाधिकाऱ्यांसाठी प्रवेशाचे दरवाजे खुले केल्याने पक्षांतर्गत मोठी उलथापालथ झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर आयाराम-गयाराम नेत्यांना मोठ्या प्रमाणावर पक्षात सामावून घेत त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने, अनेक वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष उसळला आहे. या असंतोषाचे रूपांतर आता उघड बंडखोरीत झाले असून, मुंबईपासून नागपूरपर्यंत आणि लातूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुणे आदी शहरांमध्ये भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्याने आलेल्या नेत्यांना तिकीट वाटप करण्यात आल्याने पक्षातील जुनी फळी आक्रमक झाली आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरांनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून, याचा थेट फटका भाजपच्या निवडणूक गणिताला बसण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

पुणे, नागपूर, नाशिकमध्ये असंतोषाचा उद्रेक

पुण्यात प्रभाग क्रमांक २७ (नवी पेठ–पर्वती) मधून माजी नगरसेवक अमोल बालवडकर तसेच इच्छुक उमेदवार धनंजय जाधव यांनी उमेदवारी नाकारल्याने भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. विद्यमान नगरसेवकांपैकी निम्म्याहून अधिक जणांना उमेदवारी न मिळाल्याने पुण्यात अपक्ष व इतर पक्षांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे.

नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय असलेल्या भागातच भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. येथे तरुण आणि जुने निष्ठावंत कार्यकर्ते निवडणूक लढवण्यावर ठाम असून, पक्ष नेतृत्वाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली जात आहे.

लातूरमध्ये निष्ठावंतांचा थेट लढ्याचा इशारा

लातूरमध्ये जनसंघाच्या काळापासून कार्यरत असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते कल्पतरू मंगल कार्यालयात एकत्र आले. या बैठकीत पक्षाने आमच्यावर अन्याय केला असल्याचा ठपका ठेवत, निवडणूक लढवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
“आम्हीच लातूरमध्ये भाजप जिवंत ठेवली. आता आमच्या हक्कांवर गदा येत असेल तर त्याविरोधात लढा देणे अपरिहार्य आहे,” असे ठाम मत ज्येष्ठ स्वयंसेवक नितीनकुमार शेटे यांनी व्यक्त केले.

स्वयंसेवक निनाद पंक्षित यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, इतर प्रभागांमध्येही असंतोष उफाळून आला आहे. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर तिकीट वाटपात पक्षनिष्ठा डावलल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक ‘हॉटस्पॉट’

छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्या विरोधात निष्ठावंत कार्यकर्ते आक्रमक झाले. अक्षरशः घेराव घालून संताप व्यक्त करण्यात आला. नाशिकमध्येही भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना निष्ठावंतांच्या रोषाला सामोरे जावे लागले. हातात गाजरे घेऊन निषेध करत आयात केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आला.

अमरावतीमध्येही आयारामांना उमेदवारी दिल्याने भाजप कार्यालयात जवळपास तासभर हायव्होल्टेज ड्रामा झाला.

बंडखोरांना थोपवण्यासाठी नेतृत्वाची धावपळ

महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना, बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी धावपळ सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह वरिष्ठ नेते थेट बंडखोरांशी संपर्क साधत आहेत. मात्र अनेक बंडखोरांचे फोन बंद असून ते ‘नॉट रिचेबल’ असल्याचे चित्र आहे.

भविष्यात राजकीय पुनर्वसनाची आश्वासने देत काही बंडखोरांनी माघार घेतली असली, तरी अनेकजण शेवटपर्यंत लढण्याच्या भूमिकेत आहेत. १५ जानेवारीला होणाऱ्या २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये ही बंडखोरी भाजपसाठी किती महाग ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here