मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत खांबाळे ग्रामपंचायतीत श्रमदानातून वनराई बंधारे
वैभववाडी l प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत खांबाळे ग्रामपंचायतीच्या वतीने ढोम्याच्या व्हाळावर लोकसहभागातून आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून दोन बारमाही वाहणारे वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. पावसाचे पाणी अडवून परिसरात जलसाठा निर्माण करणे, भूजल पातळी वाढवणे तसेच शेती व पाळीव जनावरांसाठी वर्षभर पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, हा या बंधाऱ्यांचा मुख्य उद्देश आहे.
स्थानिक गरजांचा सखोल विचार करून ग्रामपंचायतीने या कामाचे नियोजन केले होते. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे वेळ देत श्रमदान केल्यामुळे ही जलसंधारणाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण झाली. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविता येतात, याचे हे उपक्रम ठळक उदाहरण ठरत आहेत.
या उपक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांचे विशेष सहकार्य लाभले. कामाच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत त्यांनी आवश्यक समन्वय साधत मोलाची भूमिका बजावली.
या वेळी गटविकास अधिकारी प्रीमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सरपंच प्राजक्ता कदम, उपसरपंच मंगेश गुरव, ग्रामपंचायत अधिकारी नयना गुरखे, सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष लवू पवार, माजी सरपंच विठोबा सुतार यांच्यासह विविध पदाधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


