पाणी आडवा–पाणी जिरवा योजनेतून करुळ गावात दहा वनराई व कच्चे बंधारे उभारण्यात आले
करुळ l प्रतिनिधी
पाणी आडवा–पाणी जिरवा योजनेअंतर्गत करुळ ग्रामपंचायतीच्या वतीने गावात दहा वनराई व कच्चे बंधारे उभारण्यात आले आहेत. या सर्व बंधाऱ्यांची वैभववाडी पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी प्रीमेश वाघ यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.
गुरुवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जामदारवाडी येथे उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याचे उद्घाटन प्रीमेश वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन वर्षाचे स्वागत गावकऱ्यांनी जलसंधारणाच्या उपक्रमातून केल्याबद्दल मान्यवरांनी ग्रामपंचायतीच्या या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.
या वेळी सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, सरपंच नरेंद्र कोलते, विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, उपसरपंच भास्कर सावंत, ग्रामसेवक शशिकांत गुरव, मुख्याध्यापक दीपक घाटगे, शिक्षक विलास गुरव यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत करुळ गावात ही बंधाऱ्यांची कामे सुरू असून, ग्रामपंचायत करूळ, के. सी. महाविद्यालय मुंबई, माध्यमिक विद्यालय करूळ तसेच ग्रामसेवक संघटना वैभववाडी यांच्या सहकार्याने एकूण दहा बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे गावातील विहिरी व बोरवेलची पाण्याची पातळी वाढली असून, शेतीसाठी पाण्याचा चांगला उपयोग होत आहे. तसेच पाळीव जनावरांसाठीही या जलसाठ्याचा मोठा फायदा होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


