रत्नागिरीतील चाफे सजाचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात !
सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच
रत्नागिरी l प्रतिनिधी
खरेदी केलेल्या जागेच्या सातबारा उताऱ्यावर नाव दाखल करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी तालुक्यातील चाफे सजाचा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडला. ही कारवाई बुधवार, १ जानेवारी २०२६ रोजी चाफे येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली.
बजरंग दत्तात्रय चव्हाण (वय ५१, सध्या रा. ओम शांती अपार्टमेंट, नाचणे, रत्नागिरी; मूळ रा. कोणेगाव, ता. कराड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी मौजे आगरनरळ (ता. जि. रत्नागिरी) येथे १० गुंठे बिनशेती जागा खरेदी केली होती. या मिळकतीचा फेरफार करून सातबारा उताऱ्यावर नाव दाखल करण्यासाठी तक्रारदाराने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी चाफे येथील तलाठी कार्यालयात अर्ज सादर केला होता. मात्र, हे काम करून देण्यासाठी तसेच नाव लागलेला सातबारा उतारा व फेरफारची प्रत देण्यासाठी तलाठी बजरंग चव्हाण याने १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने ३१ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत तलाठी चव्हाण याने लाच मागितल्याचे व स्वीकारण्यास तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. यानंतर एसीबीच्या पथकाने चाफे येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना बजरंग चव्हाण याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, सुहास शिंदे आणि उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहाय्यक पोलीस फौजदार उदय चांदणे, पोलीस हवालदार दीपक आंबेकर, श्रेया विचारे तसेच पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार, समिता क्षीरसागर आणि वैशाली धनवडे यांचा समावेश होता.
———————————————————————


