मावळमध्ये ‘कीर्तन महोत्सव २०२६’ भक्तिभावात संपन्न; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती
श्री विठ्ठल परिवार, मावळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘कीर्तन महोत्सव २०२६’ हा भक्तिमय आणि प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने या महोत्सवाचे आयोजन करून विठ्ठल परिवाराने मावळ परिसरात एक भक्कम आध्यात्मिक परंपरा रुजवली असून, नववर्षाच्या स्वागतासाठी कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून केलेली ही सुरुवात निश्चितच उल्लेखनीय आहे.

या कीर्तन महोत्सवाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यांनी प्रत्यक्ष कीर्तनात सहभाग घेत भक्तिरसाचा अनुभव घेतला. तसेच पंगतीत बसून प्रसादरूपी भोजनाचा आस्वाद घेत वारकरी परंपरेतील समतेचा आणि आपुलकीचा संदेश कृतीतून दिला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित वारकरी बांधवांना संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राला मिळालेला अनमोल वारसा आहे. मानवी मूल्ये, समता, बंधुता आणि शांततेचा संदेश देणारी ही परंपरा आजही समाजाला योग्य दिशा देत आहे.”
याचवेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करत अजित पवार म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी समाजाला शिक्षण, समता आणि स्त्री-सन्मानाचा मार्ग दाखवला. “महिला भगिनींना पुरुषांच्या बरोबरीने मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा विचार केवळ बोलून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची गरज आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून संतांचे विचार, शांतता, समृद्धी आणि सद्भावना समाजात कशी नांदू शकते, याचे सुंदर दर्शन या ठिकाणी घडल्याचे त्यांनी सांगितले. साधू-संतांचे विचार तसेच शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची परंपरा हीच महाराष्ट्राची खरी ताकद असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कोरोनासारख्या कठीण काळातही विठ्ठलाचा आशीर्वाद आणि संतांचे विचार समाजासोबत होते, हीच आपल्या संस्कृतीची मोठी शक्ती असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. आजही हजारोंच्या संख्येने वारकरी बंधू-भगिनी एकत्र येतात, ही बाब अत्यंत समाधानकारक आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
भंडारा डोंगराच्या पायथ्याशी उभारण्यात येणारे संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर या आध्यात्मिक परंपरेला अधिक बळ देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्कृती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाची ही परंपरा अखंड सुरू राहो, आणि पांडुरंगाच्या कृपेने समाजात शांतता व सद्भावना नांदो, हीच प्रार्थना यावेळी व्यक्त करण्यात आली.


