स्वावलंबी नाशिक मोहिमेंतर्गत चांदवड येथे UDID कॅम्प यशस्वी
नाशिक l प्रतिनिधी
जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘स्वावलंबी नाशिक’ मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात दिव्यांग नागरिकांसाठी UDID (युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी) कॅम्प यशस्वीरीत्या पार पडला.
या कॅम्पमध्ये एकूण ३६९ दिव्यांग नागरिकांची UDID नोंदणी करण्यात आली. UDID कार्ड उपलब्ध झाल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, सवलती तसेच शासकीय लाभ अधिक सुलभ आणि वेगाने मिळणार आहेत. त्यामुळे दिव्यांग नागरिकांच्या स्वावलंबनाला मोठा हातभार लागणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. कॅम्पच्या वेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, गट विकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, सहायक गट विकास अधिकारी छोटू थोरात, तालुका आरोग्य अधिकारी हेमंत अहिरराव, गट शिक्षणाधिकारी शीतल तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच दिव्यांग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘स्वावलंबी नाशिक’ मोहिमेच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद नाशिक सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले


