क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

0
71
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

सातारा l प्रतिनिधी

नायगाव (ता. खंडाळा) येथे उभ्या राहणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक समाजातील विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल तसेच सामाजिक परिवर्तनाची बीजे रोवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महिलांना सक्षम व आत्मनिर्भर करण्यासाठी स्मारक परिसरात उभारण्यात येणाऱ्या महिला प्रशिक्षण केंद्रात सर्व प्रकारच्या आवश्यक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नायगाव येथे आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते १४३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाचे तसेच महिला प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात आणि देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अनिष्ट रूढी, जातिभेद व विषमतेविरोधात लढा देत समतेचा विचार रुजविला. त्या काळात महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी बंड पुकारून मुलींच्या शिक्षणाचा मार्ग खुला केला.

समाजात रूढीवाद, जातिवाद वाढला की सामाजिक व आर्थिक गुलामगिरी वाढते आणि त्याचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षणाचा व संपत्तीचा अधिकार नसलेल्या काळात सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. त्यांच्या विचारांवर चालतच शासनाने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याच्या योजनेला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले आहे. तसेच मोफत उपचार देणाऱ्या जन आरोग्य योजनेला महात्मा फुले यांचे नाव देण्यात आले आहे.

लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनविण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार आतापर्यंत ५० लाख महिला लखपती झाल्या असून यावर्षी हा आकडा १ कोटीपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यात दीड लाख लखपती दीदी झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

नायगावचे नाव सावित्रीबाई फुले यांच्या नावाने करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. ग्रामसभेचा ठराव ग्रामविकास विभागामार्फत पाठवल्यास त्याला विनाविलंब मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळाच्या विकासाचा इतिहास सांगत आज १४३ कोटी रुपयांचे भव्य स्मारक उभे राहत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्मारकाच्या आराखड्यास मान्यता व निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

यावेळी महिला स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री दालनांना मान्यवरांनी भेट दिली. तसेच प्रस्तावित सावित्रीबाई फुले स्मारकाची संकल्पन चित्रफीत दाखविण्यात आली.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here