मोरोशी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापक व अधिक्षिकेवर कारवाईची मागणी – रुपाली चाकणकर

0
67
मोरोशी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापक व अधिक्षिकेवर कारवाईची मागणी – रुपाली चाकणकर
मोरोशी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापक व अधिक्षिकेवर कारवाईची मागणी – रुपाली चाकणकर

मोरोशी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापक व अधिक्षिकेवर कारवाईची मागणी – रुपाली चाकणकर

ठाणे l (जिमाका)

मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील शासकीय आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली आहे. या अनुषंगाने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संबंधित आश्रमशाळेस प्रत्यक्ष भेट देत प्रशासन व पोलिसांकडून घटनेच्या चौकशीबाबत सविस्तर आढावा घेतला.

या प्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. सदर प्रकरणातील अल्पवयीन आरोपीस बालसुधारगृहात ठेवण्यात आले असून फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेतील संशयितांची सखोल चौकशी करण्यासाठी अप्पर आयुक्त, आदिवासी विकास यांच्याकडे शिफारस करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थिनींबाबत अधिक्षिकेने सादर केलेल्या गोपनीय अहवालाबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी दिरंगाई केली असल्यास, त्याचीही चौकशी करण्याचे आदेश आदिवासी विकास आयुक्तांना देण्यात आले आहेत.

या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमध्ये मानसिक तणाव निर्माण झाला असण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व विद्यार्थिनींचे समुपदेशन करण्यात यावे, अशा सूचना रुपाली चाकणकर यांनी प्रशासनाला दिल्या. यासोबतच विद्यार्थ्यांना घरी ने-आण करण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करावी, सर्व आश्रमशाळांचे रेकॉर्ड अचानक तपासणीद्वारे पडताळून पाहावेत आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी समुपदेशकांची संख्या वाढवावी, अशा सूचनाही त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना दिल्या.

दरम्यान, श्रीमती चाकणकर यांनी मयत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल व कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग त्यांच्या सोबत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या भेटीच्या वेळी आदिवासी विकास प्रकल्प उप आयुक्त अविनाश चव्हाण, प्रकल्प अधिकारी पेण तेजस्विनी गलांडे, शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नमिता शिंदे, बाल संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव, केंद्र प्रशासक तेजस्विनी पाटील तसेच पोलीस उपअधीक्षक व तपास अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here