मुंबई महापालिकेच्या मुदतठेवीतील घट; मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे दायित्व तीन लाख कोटींवर
मुंबई l प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या मुदतठेवी हा निवडणुकीत उभा राहणारा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना विचारले होते, “मुदतठेवी चाटायच्या आहेत का?” तर उद्धव ठाकरे यांनीही या मुदतठेवींवर प्रत्युत्तर दिले आहे.
एकेकाळी ९१ हजार कोटींहून अधिक असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुदतठेवी सध्या घटत्या आहेत. पालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदतठेवी विविध बँकांमध्ये ठेवल्या जातात, ज्या बँकांचे व्याजदर सर्वाधिक असते त्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते. या ठेवींमधून पालिकेचा आर्थिक अंदाज घेतला जातो, तसेच आस्थापना खर्च, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी आणि विविध विकासकामांसाठी कंत्रादारांकडून घेतलेल्या अनामत रकमेचे भांडवल मिळते.
कोरोना काळानंतर बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात आले आणि मार्च २०२२ मध्ये १४,७५० कोटींचा महसूल मिळाल्यामुळे मुदतठेवी ९१ हजार कोटींहून अधिक झाल्या होत्या. मात्र, जून २०२५ मध्ये या मुदतठेवी ८०,७४० कोटींवर आल्या आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांत महापालिकेने मोठमोठे पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. रस्त्यांची काँक्रीटीकरण कामे, पूल, वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्ग, दहिसर-भाईदर जोड रस्ता, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता यासारख्या प्रकल्पांमुळे पालिकेचे दायित्व तब्बल दोन ते अडीच लाख कोटींवर पोहोचले आहे, आणि नवीन प्रकल्पांचा समावेश झाल्याने ते आता तीन लाख कोटींवर गेले आहे.


