
गणपतीपुळे येथे जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनात ६३.५१ लाखांची विक्री; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठा प्रतिसाद
गणपतीपुळे – गणपतीपुळे येथे २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत आयोजित जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शन व विक्री २०२५ मधून तब्बल ६३ लाख ५१ हजार ९७३ रुपयांची विक्री झाली. यामध्ये ५० लाख ४० हजार ६८ रुपयांची उत्पादन विक्री तर १३ लाख ११ हजार ९०५ रुपयांची खाद्यपदार्थांची विक्री नोंदविण्यात आली आहे.
स्वयंसाहाय्यता समूहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदर्शनाला मिळालेला वाढता प्रतिसाद लक्षात घेता एकूण ८३ स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये ६४ उत्पादन स्टॉल आणि १९ खाद्य स्टॉल स्वयंसाहाय्यता समूहांना उपलब्ध करून देण्यात आले.
या प्रदर्शनात महिलांनी उत्पादित केलेल्या विविध कलात्मक वस्तू जसे की बुरूड काम, गोधडी, लोकरीच्या विणकामाच्या वस्तू, क्रेयॉनपासून बनविलेल्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी यांचा समावेश होता. तसेच मच्छी मसाला, मटण मसाला यांसह विविध घरगुती मसाले, पिठे, नाचणी, उडीद, लसूण, सोयाबीन, पालक, बीट, टोमॅटो, पोह्याचे व ओव्याचे पापड ग्राहकांना आकर्षित करत होते.
याशिवाय आंबा, लिंबू, मिरची, आवळा, करवंद आदी लोणची, कोकम, आगळ, कोकणी मेवा, काजूगर, काजू मोदक, आंबावडी, आमरस, आंबापोळी, आवळा मावा, फणसपोळी, करवंद वडी, तळलेले गरे यांसारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले गेले. जांभूळ, आंबा, काजू व आवळ्याची सरबते, रस, तसेच मोदक, आंबोळी, थालीपीठ, पुरणपोळी, घावणे, नारळवडी यांसारखे कोकणी खाद्यपदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले.
प्रदर्शनात नर्सरी स्टॉलद्वारे आंबा, काजू, नारळ, चिकू, कोकम यांची कलमे, शोभिवंत फुलझाडे, बोन्साय तसेच मधही माफक दरात उपलब्ध करून देण्यात आला. या प्रदर्शनामुळे स्वयंसाहाय्यता समूहातील महिलांना आर्थिक बळकटी मिळाली असून त्यांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

