निवडणूक आयोगावर पारदर्शकतेचा आरोप
उमेदवारांचे प्रतिज्ञापत्रे अद्याप अपलोड नाहीत
मुंबई l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या (Maharashtra SEC) आधीच्या नियमांनुसार उमेदवारी अर्ज दाखल होताच, छाननीपूर्वी सर्व उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हिट्स) त्वरित संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक असते. मात्र, याव्यतिरिक्त छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही आणि अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरही ही प्रतिज्ञापत्रे अद्याप ऑनलाइन उपलब्ध नाहीत, असा गंभीर आरोप आता समोर आला आहे.
‘आम आदमी पक्ष’ (AAP) ने या पारदर्शकतेच्या तुटवड्याचा उल्लेख करत आयोगावर तीव्र टीका केली आहे. आयोगाने नियम व ‘रिटर्निंग ऑफिसर’ (आरओ) हँडबुकमध्ये स्पष्ट केलेले आदेश असूनही प्रतिज्ञापत्रे अपलोड न केल्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो, असा आरोप त्यांनी केला आहे.
पनवेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही अनेक प्रभागांतील उमेदवारांचे प्रतिज्ञापत्रे संकेतस्थळावर अद्याप दिसत नसल्याने मतदारांमध्ये नाराजी आणि गोंधळ उत्पन्न झाला आहे.
तसेच मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतही अनेक प्रभागातील उमेदवारांचे शपथपत्रे आठवडाभरानंतरही अपलोड न झाल्याचे आढळले आहे, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
राजकीय पक्ष आणि नागरिकांसह निवडणूक तज्ज्ञही म्हणतात की, उमेदवारांचे प्रतिज्ञापत्रे वेळेवर सार्वजनिक करणे ही निवडणुकीतील पारदर्शकता आणि नागरिकांचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.


