तालुका पत्रकार विकास मंचाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील
प्रतिनिधी
तालुका पत्रकार विकास मंचाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड ६ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या पत्रकार दिन सोहळ्यात जाहीर करण्यात आली. यावेळी मंचाची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून मावळते अध्यक्ष मंदार दोंदे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी उपस्थित सदस्यांनी पत्रकारितेत वाढत चाललेल्या अपप्रवृत्तींना थेट विरोध करून त्यांना जागीच ठेचण्याची शपथ घेतली.
दर्पण या भारतातील पहिल्या वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी रोजी पहिला अंक प्रसिद्ध केला होता. त्या स्मरणार्थ दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त सल्लागार माधव पाटील यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष म्हणून दीपक घोसाळकर यांची निवड झाली आहे. सचिवपदी हरीश साठे यांची पुनर्निवड करण्यात आली असून सहसचिव म्हणून राजू गाडे तर खजिनदारपदी दत्ता कुलकर्णी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
या सोहळ्यास सल्लागार माधव पाटील, विवेक पाटील, मंदार दोंदे, संजय कदम, सुनील राठोड यांच्यासह नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष दीपक घोसाळकर, खजिनदार दत्ता कुलकर्णी, सहसचिव राजू गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.


