‘संजीवनी’ प्रकल्पातून ग्रामीण आरोग्यसेवेला नवे बळ
ठाण्यात दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण
ठाणे (जिल्हा परिषद) – ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि प्रभावी आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ आणि पीपीएफएएस म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त सीएसआर सहकार्यांतर्गत ‘संजीवनी’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ठाणे जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण करण्यात आले असून, प्रत्येक केंद्रास ७० हून अधिक अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व आरोग्य साहित्य प्रदान करण्यात आले आहे.
या सुविधांमुळे संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या दररोज १०० हून अधिक रुग्णांना थेट लाभ मिळणार आहे. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
उन्नतीकरण व साहित्य हस्तांतरणाचा उद्घाटन सोहळा २ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना रणजित यादव म्हणाले, “ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिक सक्षम होत आहेत, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. भविष्यातही अशा सहकार्याची अपेक्षा आहे.”
याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की, “मेकिंग द डिफरन्स एनजीओच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण करण्यात आले आहे. पीपीएफएएस म्युच्युअल फंड व एमटीडी यांच्या सहकार्यामुळे उपलब्ध झालेली आधुनिक वैद्यकीय उपकरणे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी बनवतील.”
या उपक्रमांतर्गत प्रत्येकी सुमारे ५० लाख रुपये किमतीचे साहित्य देण्यात आले असून त्यामध्ये लॅपरोस्कोप, आयसीयू बेड, स्ट्रेचर, बेबी वॉर्मर, ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सीजन सिलेंडर, ऑपरेशन इन्स्ट्रुमेंट्स, फंक्शनल बेड, मेडिसिन ट्रॉली, डीप फ्रिजर, फ्रिज, टीव्ही, कपाटे, टेबल व खुर्च्या आदींचा समावेश आहे.
‘संजीवनी’ प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट होत असून, नागरिकांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम जीवनदायी ठरत असल्याची भावना स्थानिक स्तरावर व्यक्त केली जात आहे.


