
दिव्यांग क्षेत्रातील संस्थांसाठी नोंदणी अनिवार्य
३१ जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणी आवश्यक
मुंबई l प्रतिनिधी
मुंबई उपनगर जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात अनेक संस्था विना नोंदणी कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर, रविकिरण पाटील यांनी सांगितले की, दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्थांनी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणी करणे बंधनकारक आहे.
दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ नुसार, संस्थेची नोंदणी न करता कार्य करणे कायद्याचे उल्लंघन आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील ज्या संस्थांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करायचे आहे, त्यांनी नोंदणीसाठी आवश्यक प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयाकडे सादर करावा.
नोंदणी न करता कार्यरत असलेल्या संस्थांवर दिव्यांग हक्क अधिनियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

