आंतरराष्ट्रीय शेफ महाराष्ट्र सदनाच्या आदरातिथ्याने भारावले; मराठी खाद्यसंस्कृतीचे कौतुक
जगातील विविध देशांतील ३० नामांकित आंतरराष्ट्रीय शेफच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने महाराष्ट्र सदनाला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले.
महाराष्ट्राचे वैभव, समृद्ध परंपरा आणि आदरातिथ्य अनुभवून हे परदेशी पाहुणे विशेषतः प्रभावित झाले. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारशाची सविस्तर माहिती देण्यात आली.
या भेटीदरम्यान ऑस्ट्रेलिया, युक्रेन, मॅसेडोनिया, मलेशिया, मालदीव, दक्षिण आफ्रिका, सर्बिया, फिलिपिन्स, उझबेकिस्तान, श्रीलंका, सिंगापूर, व्हिएतनाम, फ्रान्स, दुबई, केनिया, मॉरिशस, इंडोनेशिया आदी देशांतील ३० पाककला तज्ज्ञांनी महाराष्ट्र सदनाच्या भव्य वास्तूशिल्पाची पाहणी केली.
निवासी आयुक्त आर. विमला यांनी उपस्थित शेफना महाराष्ट्रातील सांस्कृतिक विविधता तसेच जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेल्या महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये समजावून सांगितली. परंपरा, स्वाद आणि पोषणमूल्यांचा अनोखा संगम असलेली मराठी पाककला ही राज्याची ओळख असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या भेटीत परदेशी पाहुण्यांनी श्रीखंड, पुरणपोळी, झुणका-भाकरी, कढी आणि मसालाभात यांसारख्या पारंपरिक मराठी पदार्थांचा आस्वाद घेतला. या अस्सल मराठमोळ्या मेजवानीने आंतरराष्ट्रीय शेफ विशेषतः भारावून गेले आणि त्यांनी मराठी खाद्यसंस्कृतीचे मुक्तकंठाने कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांचा पारंपरिक दिवे भेट देऊन सन्मान करण्यात आला. भारतीय संस्कृतीत प्रकाश, सकारात्मकता आणि शुभत्वाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या दिव्यांचा स्वीकार करताना पाहुण्यांनी मनापासून आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली.


