मानधन न मिळाल्याने शशांक केतकरचा सोशल मीडियावर संताप

0
86
मानधन न मिळाल्याने शशांक केतकरचा सोशल मीडियावर संताप
मानधन न मिळाल्याने शशांक केतकरचा सोशल मीडियावर संताप

मानधन न मिळाल्याने शशांक केतकरचा सोशल मीडियावर संताप कलाकारांचा पाठिंबा, अंकिता वालावलकरची कमेंट चर्चेत

मुंबई l प्रतिनिधी

मराठी अभिनेता शशांक केतकर याने निर्माते मंदार देवस्थळी यांच्याकडून कामाचे मानधन न मिळाल्याचा आरोप करत सोशल मीडियावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. शशांकने यासंदर्भात एक व्हिडिओ पोस्ट करताना देवस्थळी यांच्यासोबत झालेल्या व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. या पोस्टमुळे मराठी मनोरंजन विश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

शशांकच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येऊ लागल्या असून अनेक चाहत्यांसह मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनीही त्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न हा नेहमीच दुर्लक्षित राहतो, अशी भावना अनेकांनी कमेंट्समधून व्यक्त केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात विशेष लक्ष वेधून घेतली आहे ती कोकणहार्टेडगर्ल म्हणून ओळखली जाणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिच्या कमेंटने. अंकिताने शशांकच्या पोस्टखाली कमेंट करत आपल्या नवऱ्याचे नाव उल्लेखत, “तुझे ज्यांनी डुबवलेत त्यांची नावं लिहू का रे मी इथे?” असे लिहिले आहे. या एका ओळीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

अंकिताचा पती कुणाल भगत हा मराठी मनोरंजनसृष्टीतील परिचित संगीत दिग्दर्शक असून त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांसाठी संगीत दिले आहे. अंकिताच्या या कमेंटवरून कुणाललाही आपल्या कामाचे पैसे मिळाले नसावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घडामोडींमुळे मराठी चित्रपट आणि मालिकांच्या निर्मिती क्षेत्रात कलाकार व तंत्रज्ञांना वेळेवर मानधन न मिळण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शशांक केतकरच्या पोस्टमुळे हा विषय केवळ वैयक्तिक न राहता संपूर्ण मनोरंजन विश्वासाठी एक गंभीर प्रश्न बनला असून, यावर पुढे काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here