कणकवलीत ‘पालकमंत्री चषक’ भजन स्पर्धेचे भव्य आयोजन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेला योग्य सन्मान व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने भव्य ‘पालकमंत्री चषक’ भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ‘पुष्प तिसरे’ म्हणजेच कणकवली तालुकास्तरीय भजन स्पर्धा येत्या शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी कणकवली येथे होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये प्रथमच अशा व्यापक स्वरूपात तालुकास्तरीय भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, भजनी परंपरेला नवी दिशा देण्याचा हा प्रयत्न आहे. कणकवली तालुक्यातील या स्पर्धेसाठी मोठी चुरस निर्माण झाली असून तब्बल २५ नामांकित भजनी मंडळांनी सहभाग नोंदविला आहे. विजेत्या संघांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेतील पारितोषिके पुढीलप्रमाणे असणार आहेत – प्रथम क्रमांकास १०,०२३ रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास ५,०२३ रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकास ३,०२३ रुपये व आकर्षक चषक, तर चतुर्थ क्रमांकास २,०२३ रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. यासोबतच वैयक्तिक कौशल्याला दाद देण्यासाठी उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वादक, उत्कृष्ट तबलावादक आणि उत्कृष्ट कोरस या श्रेणींमध्ये प्रत्येकी १,०२३ रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
शनिवारी दि. १० जानेवारी रोजी भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे सकाळी १० वाजता या भजन स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली शहरातच ही स्पर्धा होत असल्याने आयोजकांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष कानडे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. कणकवली तालुक्यातील भजनप्रेमी व रसिकांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग यांनी यापूर्वी कुडाळ येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली होती. त्यानंतर पालकमंत्री चषक भजन स्पर्धांची जिल्हाभर सुरुवात झाली. देवगड तालुक्यातील पहिली तालुकास्तरीय भजन स्पर्धा कुणकेश्वर येथे मोठ्या उत्साहात पार पडली, तर वैभववाडी तालुक्यातील स्पर्धेलाही भजनी मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर कणकवलीतील तालुकास्तरीय स्पर्धाही तितक्याच यशस्वी ठरेल, असा विश्वास भजनी बुवा संतोष कानडे यांनी व्यक्त केला आहे.


