देवगड एसटी स्थानक परिसर नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास
देवगड l प्रतिनिधी
देवगड एसटी स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू असून यातील बहुतांश काम पूर्णत्वास गेले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खड्डे तातडीने बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी तसेच शौचालयाच्या टाकीचे काम पूर्ण करून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.
या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघातही घडले आहेत. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दुचाकी घसरून अपघात झाला होता. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही; मात्र दुचाकीवर शाळकरी मुले व त्यांचे पालक असल्याने मोठा अनर्थ टळला. या मार्गावरून देवगड बाजारपेठ, किल्ला, आनंदवाडी आदी ठिकाणी जाणारी वाहतूक सातत्याने सुरू असते. गावकर कोल्ड्रिंक्स व एसटी स्थानकासमोर रस्त्यावर पडलेले हे महाकाय खड्डे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेस तसेच या मार्गावरील वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत होते.गेल्या पाच महिन्यांपासून मुख्य रस्त्यासह स्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
मात्र शौचालयाच्या टाकीचे उत्खनन अद्याप न झाल्याने घाणीचे पाणी स्थानक परिसरात साचून रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर ठरणाऱ्या या परिस्थितीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


