रानबांबुळी ग्रामसभेचा ठराव — नगरपंचायतीत समावेशाला ठाम विरोध

0
78
रानबांबुळी ग्रामसभेचा ठराव — नगरपंचायतीत समावेशाला ठाम विरोध
रानबांबुळी ग्रामसभेचा ठराव — नगरपंचायतीत समावेशाला ठाम विरोध

रानबांबुळी ग्रामसभेचा ठराव — नगरपंचायतीत समावेशाला ठाम विरोध

गाव स्वतंत्र ठेवण्याची मागणी; आर्थिक भुर्दंडाची भीती व्यक्त

ओरोस l प्रतिनिधी 

रानबांबुळी गावाची ग्रामसभा सरपंच परशुराम परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेत गावाच्या भविष्यातील प्रशासकीय रचनेबाबत अत्यंत महत्त्वाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, धरण प्रकल्प तसेच रेल्वे प्रकल्पासाठी सर्वाधिक जमीन रानबांबुळी गावाचीच संपादित झालेली असल्याने, या गावावर आधीच मोठा विकासात्मक ताण आलेला आहे. त्यामुळे रानबांबुळी गावाचा सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीत समावेश न करता गाव स्वतंत्र व अबाधित ठेवावा, अशी ठाम मागणी ग्रामसभेत करण्यात आली.

ग्रामसभेत स्पष्ट करण्यात आले की, भूसंपादनामुळे गावाने मोठा त्याग केलेला असून, त्यानंतरही ‘वाढीव विकास झोन’ या नावाखाली ७७ हेक्टर क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. या क्षेत्रातील विकसित पारंपारिक निवासी वापर झोन वगळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी एकमताने केली. या संदर्भात यापूर्वी खासदार नारायण राणे यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावेळी ६० हेक्टर क्षेत्र वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे धुरीवाडी तसेच गावातील काही वाड्यांमध्ये विकास सुरू झाल्याचे ग्रामसभेत नमूद करण्यात आले.

नगरपंचायत झाल्यास प्रॉपर्टी कार्ड, करवाढ आणि प्रशासकीय गुंतागुंत यामुळे ग्रामस्थांवर आर्थिक भुर्दंड पडेल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. सध्या ग्रामपंचायतीमार्फत तातडीने मिळणारे दाखले, प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रांसाठी नगरपंचायतीत गेल्यास नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतील, असेही ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामपंचायत असो वा नगरपंचायत, विकास निधी येतोच; मात्र नगरपंचायत झाल्यास त्याचा भार थेट सामान्य नागरिकांवर पडणार असल्याचा सूर ग्रामसभेत उमटला.

यावेळी काही ग्रामस्थांनी रानबांबुळी गावाच्या चारही बाजूंना ‘रानबांबुळी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे’ असे फलक लावावेत, अशी सूचनाही मांडली. गावाची स्वतंत्र ओळख जपणे आणि ग्रामपंचायत स्वरूपातच विकास घडवून आणणे, हीच ग्रामस्थांची सामूहिक भूमिका असल्याचे या ग्रामसभेत स्पष्ट झाले.

या ग्रामसभेला उपसरपंच अंजली कदम, ग्रामसेवक श्री. धुरी, ग्रामपंचायत सदस्य वसंत बांबुळकर, काका परब, अशोक परब, प्रसाद गावडे, संजय लाड यांच्यासह दीडशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. पाणीपुरवठा योजना, रस्ते व दिवाबत्ती, वित्त आयोग व राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

अखेर ग्रामसभेने एकमताने ठराव मंजूर करत, रानबांबुळी गावाचा सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीत समावेश करण्यास आमचा ठाम विरोध असून गाव स्वतंत्र व अबाधित ठेवावे, अशी स्पष्ट भूमिका नोंदवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here