कणकवलीत पूर्ववैमनस्यातून चाकू हल्ला; नेपाळी युवक गंभीर जखमी, आरोपी फरार
कणकवली l प्रतिनिधी
कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास एका नेपाळी युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. लोकेश बिस्ट (वय २२, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. कणकवली) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश बिस्ट याचा मित्र छोटू हा मंगळवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित होता. त्यावेळी एका अज्ञात संशयिताने छोटूला पकडून ठेवत लोकेशला फोन करून चौकात बोलवण्यास सांगितले. लोकेश घटनास्थळी आल्यानंतर संशयित व लोकेश यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या वादातून संशयिताने लोकेशला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली आणि हातातील चाकूने थेट डोक्यावर वार करून प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर संशयिताने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
या हल्ल्यात लोकेश बिस्ट गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


