फोंडाघाटातील पूल पुनर्बांधणीवर ग्रामस्थांचा तीव्र संताप; विश्वासात न घेता आदेश दिल्याचा आरोप

0
291
फोंडाघाटातील पूल पुनर्बांधणीवर ग्रामस्थांचा तीव्र संताप; विश्वासात न घेता आदेश दिल्याचा आरोप
फोंडाघाटातील पूल पुनर्बांधणीवर ग्रामस्थांचा तीव्र संताप; विश्वासात न घेता आदेश दिल्याचा आरोप

फोंडाघाटातील पूल पुनर्बांधणीवर ग्रामस्थांचा तीव्र संताप; विश्वासात न घेता आदेश दिल्याचा

देवगड–निपाणी राज्यमार्ग क्रमांक १७८ वरील ब्रिटिशकालीन दोन पूल पाडून पुनर्बांधणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी ७ जानेवारी २०२६ रोजी काढलेल्या पत्रानुसार १५ जानेवारीपासून वाहतूक वळविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या निर्णयाबाबत फोंडाघाट ग्रामपंचायत, सरपंच, स्थानिक ग्रामस्थ तसेच पुलालगतचे कबजेदार यांना कोणतीही पूर्वसूचना अथवा विश्वासात न घेता आदेश काढण्यात आल्याने फोंडावासीयांमध्ये तीव्र जनक्षोभ उसळला आहे.

१५ जानेवारीपासून दोन्ही पूल पाडण्याचे काम सुरू होणार असले तरी या संदर्भात पर्यायी मार्ग, वाहतूक वळविण्याची व्यवस्था, कामाचा कालावधी याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. ठेकेदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांशी कोणतीही चर्चा न करता घेतलेला हा निर्णय मनमानी असून, “हम करे सो कायदा” अशा पद्धतीचा असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रथम प्रत्यक्ष पाहणी करून, ग्रामपंचायत व नागरिकांना विश्वासात घेऊन लेखी हमी द्यावी आणि त्यानंतरच काम सुरू करावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

फोंडाघाट बाजारपेठ ही कोकण व कोल्हापूरला जोडणारी महत्त्वाची उतारपेठ म्हणून ओळखली जाते. आंबोली, गगनबावडा व वैभववाडी घाट मार्गांवरील दुरुस्तीमुळे सध्या देवगड–निपाणी मार्गावर पर्यटकांसह अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे. अशा परिस्थितीत सुस्थितीतील हे दोन ब्रिटिशकालीन पूल अचानक पाडण्याचा निर्णय घेतल्यास फोंडाघाट बाजारपेठेचे आर्थिक नुकसान होऊन संपूर्ण परिसरावर विपरीत परिणाम होणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

आदेशात नमूद केलेले पर्यायी मार्ग गावाला तोडणारे, लांबचे व गैरसोयीचे असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तहसीलदार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता कार्यालयातूनच शिफारसी केल्यामुळे हा निर्णय झाला असल्याचा संताप ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे पूल बांधणी पूर्ण होईपर्यंत नागरिकांना आर्थिक भुर्दंड, मानसिक त्रास व दैनंदिन अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या हॅम विभागांतर्गत निखिल कन्स्ट्रक्शनमार्फत घाटाचे रुंदीकरण, संरक्षक भिंती, गटारे, काँक्रिटीकरण व डांबरीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू असून, या कामासाठीची वाहतूकही याच रस्त्यावरून होत आहे. पूल पाडल्यास या कामांनाही मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. देवगड–निपाणी रस्ता संबंधित यंत्रणेकडे हस्तांतरित झाला असला, तरी हे दोन पूल हस्तांतरणापूर्वीच सिंधुदुर्ग बांधकाम विभागाकडे राखून ठेवण्यात आल्याने ठेकेदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी रस्ता बंद करण्यासाठी निखिल कन्स्ट्रक्शनने दिलेल्या पत्रास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती; मग अचानक पूल पाडण्यासाठी वाहतूक वळविण्याचे आदेश का देण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर फोंडाघाट ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, योग्य पर्यायी व्यवस्था जाहीर करावी आणि काम पूर्ण होण्याची निश्चित मुदत सांगावी, त्यानंतरच पूल पुनर्बांधणीस सुरुवात करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा विनापरवानगी उपोषणाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here