‘दशावतार’ ऑस्कर २०२६च्या मुख्य शर्यतीत !
मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण
मुंबई l प्रतिनिधी
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरणारी बातमी समोर आली आहे. ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट २०२६ च्या ऑस्कर पुरस्कारांच्या मुख्य स्पर्धेच्या (Contention List) यादीत निवडला गेला असून, ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळवणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. जागतिक स्तरावर निवडल्या गेलेल्या १५० ते २५० आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या यादीत ‘दशावतार’चा समावेश झाला असून, हा ऑस्कर नामांकन प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
या निवडीमुळे मराठी सिनेसृष्टीची जागतिक व्यासपीठावर दखल घेतली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. आशयघन विषय, सशक्त मांडणी आणि दर्जेदार अभिनय यामुळे ‘दशावतार’ने आंतरराष्ट्रीय परीक्षकांचे लक्ष वेधले आहे. ऑस्करच्या पुढील टप्प्यांमध्ये चित्रपट कशी मजल मारतो, याकडे आता संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागून राहिले आहे.
‘दशावतार’च्या या यशामुळे मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर नवे दालन खुले झाले असून, आगामी काळात मराठी सिनेमांचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
२०२५ मधले टॉप मराठी चित्रपट कलेक्शन :: दशावतार – २८ कोटी जारण – ९ – १० कोटी सुशीला सुजित – ८.५० कोटी गुलकंद – ८.१० कोटी आता थांबायचं नाय – ५ कोटी


