मुंबई महापालिका प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष
मुंबईत तब्बल नऊ वर्षांनंतर काल मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडली असून, आज या बहुप्रतिक्षित निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांसाठी मुंबई जिंकणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण २२७ वॉर्ड असून, तब्बल १,७०० उमेदवारांनी या निवडणुकीत आपले नशीब आजमावले आहे. मुंबईकरांनी कुणाला कौल दिला, हे काही तासांत स्पष्ट होणार आहे.
राज्यात काल एकूण २९ महानगरपालिकांसाठी मतदान झाले असून, आज सर्व महापालिकांचे निकाल जाहीर होत आहेत. मात्र, देशभराचे लक्ष प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे लागले आहे. गेल्या अनेक दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले असून, शिवसेना म्हणजे ठाकरे अशीच ओळख होती.
मात्र, २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडून दोन गट निर्माण झाले. अधिकृत शिवसेना पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे असून, उद्धव ठाकरे गट मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहे. एकेकाळी मुंबईवर ठाकरे कुटुंबाचे एकहाती वर्चस्व होते; मात्र आता परिस्थिती बदलली असून, मुंबईत ठाकरे बंधूंनी अस्तित्वाची लढाई सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती करून ही निवडणूक लढवली आहे.
दुसरीकडे, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हे आव्हान अधिक मजबूत ठरत आहे. अखेर मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडणार, हे आजच्या निकालातून स्पष्ट होणार असून, या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


