रत्नागिरीच्या वैद्य निकिता कोळी यांना ‘आयुर्वेद विमेन्स लीडरशिप यूथ आयकॉन अवॉर्ड’
रत्नागिरी येथील आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य निकिता कोळी यांना “आयुर्वेद विमेन्स लीडरशिप यूथ आयकॉन अवॉर्ड” प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे १० व ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील “आयुर्वेद महिला नेतृत्व आयकॉन पुरस्कार २०२६” या समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आयुर्वेद क्षेत्रातील नेतृत्व, संशोधन, शिक्षण, चिकित्सक सेवा आणि सामाजिक योगदान या विविध निकषांवर वैद्य निकिता कोळी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्या कन्सल्टंट आयुर्वेदिक फिजिशियन व गर्भसंस्कार तज्ज्ञ असून, आयुर्वेद केवळ उपचारपद्धती न राहता जीवनशैली म्हणून समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत.
प्रि-कन्सेप्शन केअर, गर्भसंस्कार, गर्भिणी परिचर्या, सूतिका परिचर्या, बालसंस्कार, आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजी, होलिस्टिक हेल्थ व वेलनेस या विषयांत त्यांचे विशेष योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी के.ई.एम. हॉस्पिटल, कामगार कल्याण वेल्फेअर बोर्ड, ब्रीच कँडिडेट्स ट्रस्ट यांसारख्या संस्थांसोबत कार्य केले आहे.
आयुर्वेदिक मेडिकल विद्यापीठ, नागपूर येथून त्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून, सध्या शिक्षणासोबतच संशोधन व मार्गदर्शन क्षेत्रातही त्या सक्रिय आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आयुर्वेद व वेलनेस अकॅडमींशी त्यांचा सहभाग असून, ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे देश-विदेशातील रुग्णांना सेवा देत आहेत.
या पुरस्कारामुळे रत्नागिरीसह कोकणातील आयुर्वेद क्षेत्राला राष्ट्रीय पातळीवर गौरव मिळाला असून, वैद्य निकिता कोळी यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


