परशुराम डोंगरावर भीषण वणवा
चिपळूण : ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लाभलेल्या चिपळूण तालुक्यातील परशुराम डोंगर परिसरात बुधवारी सायंकाळी भीषण वणव्याने थैमान घातले. अचानक पेटलेल्या या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी गेले असून संपूर्ण परिसर धुराच्या प्रचंड लोटांनी व्यापला आहे. हा धूर दूरवरूनही स्पष्टपणे दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या वणव्यात शेकडो झाडे, झुडपे, गवत तसेच मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली आहे. परिणामी या परिसरातील जैवविविधतेला मोठा फटका बसला असून अनेक लहान-मोठे वन्यजीव आगीत अडकून मृत्युमुखी पडल्याची किंवा त्यांचे नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परशुराम डोंगर परिसरात दरवर्षी वणव्याच्या घटना घडत असून, मागील वेळेस वनविभागाने पुढाकार घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली होती. मात्र यंदाही पुन्हा वणवा लागल्याने वारंवार होणाऱ्या अशा घटनांबाबत निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वणव्यांमुळे होत असलेली पर्यावरणाची हानी थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


