जि. प. – पं. स. निवडणुकांसाठी महायुती सक्रिय; जागावाटपाचा तिढा कायम

0
62
जि. प. – पं. स. निवडणुकांसाठी महायुती सक्रिय; जागावाटपाचा तिढा कायम
जि. प. – पं. स. निवडणुकांसाठी महायुती सक्रिय; जागावाटपाचा तिढा कायम

जि. प. – पं. स. निवडणुकांसाठी महायुती सक्रिय; जागावाटपाचा तिढा कायम

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच रत्नागिरीच्या राजकीय मैदानात महायुतीच्या हालचालींना वेग आला आहे. मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी शिवसेना व भाजपच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र या बैठकीत जागावाटपाचा प्रश्न सुटू न शकल्याने कोणतीही ठोस घोषणा न करताच बैठक आटोपती घेण्यात आली. परिणामी इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक कायम आहे.

नगर परिषद आणि नगरपंचायतीमधील विजयाचा फॉर्म्युला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही राबवण्यावर शिवसेना-भाजपमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. पाली येथील बैठकीला माजी आमदार डॉ. विनय नातू, अनिकेत पटवर्दन तसेच भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी अॅड. दीपक पटवर्धन यांच्यासह दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार प्रत्येक गट व गणाच्या ताकदीवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.

बैठकीत महायुती कायम राहणार यावर शिक्कामोर्तब झाले असले, तरी नेमकी किती जागा कुणी लढवायच्या यावर अद्याप एकमत झालेले नाही. प्राथमिक पातळीवर चर्चा झाली असली तरी जागावाटप किंवा उमेदवारांच्या नावांबाबत अंतिम निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्यात आली असून वरिष्ठांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असून हातात अवघे दोन दिवस उरल्याने नेत्यांच्या दरबारी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. ठोस निर्णय झाला नसला तरी तयारीला लागण्याचे संकेत नेत्यांकडून देण्यात येत असल्याने राजकीय हालचाली अधिकच वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here