‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता न मिळाल्याने भंडाऱ्यात महिलांचे चक्का जाम आंदोलन
भंडारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते वर्ग झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला असला, तरी अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात महिलांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन करत चक्का जाम केला.
या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तांत्रिक अडचणी व यादीतील त्रुटींमुळे काही महिलांना मानधन मिळाले नसल्याचे सांगितले जात असले, तरी महिलांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. हप्ते तातडीने जमा न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.


