सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये चुकीचे निदान

0
52
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये चुकीचे निदान
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये चुकीचे निदान

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये चुकीचे निदान

ट्यूमर असलेल्या महिलेला गर्भवती ठरवले

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारातील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, पोटात ट्यूमर असलेल्या एका महिलेला गर्भवती असल्याचे चुकीचे निदान करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अधिक उपचारांसाठी या महिलेला गोवा येथील बांबुळी मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले असता, तेथे तपासणीदरम्यान गर्भधारणा नसून पोटात ट्यूमर असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, कॉलेज सुरू होऊन चौथे वर्ष सुरू झाले तरीही आरोग्यसेवांमध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे चित्र आहे. येथून अद्यापही मोठ्या प्रमाणात रुग्ण गोवा मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

संबंधित महिला बुधवारी मध्यरात्री सुमारे १ वाजता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक परिसरात आढळून आली होती. याची माहिती मिळताच सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला गर्भवती असल्याचे जाहीर करत प्रसूती गुंतागुंतीची असल्याचे नमूद केले.

यानंतर पहाटे सुमारे ४ वाजता महिलेला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. तेथे करण्यात आलेल्या सखोल तपासणीत गर्भधारणा नसून पोटात ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले. या चुकीच्या निदानाबाबत गोवा मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनीही नाराजी व्यक्त केली असून, या घटनेमुळे सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here