श्रीकांत शिंदेंच्या डावपेचामुळे शिवसेनेचा महापौर निश्चित
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, या निवडणुकीत बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबईत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीचा महापौर विराजमान होणार असून, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकेतही दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढविल्याने तेथे महापौरपदासाठी हालचालींना वेग आला आहे. मात्र, अशा परिस्थितीत एका महापालिकेत घडलेल्या अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे भाजपाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
उल्हासनगर महापालिकेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी खेळलेल्या एका निर्णायक राजकीय डावामुळे संपूर्ण समीकरण बदलले आहे. उल्हासनगर महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ७८ जागांसाठी मतदान झाले होते. निकालानंतर भाजपाला ३७ जागा मिळाल्याने येथे भाजपाचाच महापौर बसेल, असे जवळपास निश्चित मानले जात होते. शिवसेनेच्या (शिंदे गट) जागा कमी असल्याने भाजपची सत्ता येणार, अशीच राजकीय वर्तुळात चर्चा होती.
मात्र, ऐनवेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूत्रे हातात घेत मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली. उल्हासनगरमधील अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. परिणामी भाजपाचे संख्याबळ ३७ वरच राहिले असून, शिवसेना भाजपापेक्षा एक जागेने पुढे गेली आहे.
सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश हा उल्हासनगरमधील सत्तासंघर्षात गेमचेंजर ठरला आहे. यासोबतच शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही विजयी उमेदवारही सोबत घेतल्याने बहुमताचा आकडा अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे आता उल्हासनगर महापालिकेत थेट शिवसेनेचाच महापौर विराजमान होणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
श्रीकांत शिंदे यांनी योग्य वेळी केलेल्या या राजकीय खेळीमुळे भाजपाचे गणित पूर्णपणे कोलमडले असून, जवळपास निश्चित मानली जाणारी सत्ता त्यांच्या हातातून निसटल्याचे चित्र आहे. आकडे बदलताच भाजप अडचणीत सापडला असून, उल्हासनगरमधील ही घडामोड राज्याच्या राजकारणातही चर्चेचा विषय ठरली आहे. आता पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले असून, उल्हासनगरमधील सत्ता संघर्षाचा अंतिम पडदा कसा पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


