स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती रॅली उत्साहात संपन्न
म्हसळा : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ च्या पार्श्वभूमीवर स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमांतर्गत दि. २० जानेवारी २०२६ रोजी म्हसळा तालुक्यातील आदिवासी वाडी, मेंदडीकोंड येथे मतदार जनजागृती रॅली यशस्वीरीत्या पार पडली. या रॅलीद्वारे मतदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

“माझे मत – माझा हक्क”, “प्रत्येक मत अमूल्य आहे”, “लोकशाही मजबूत करा – मतदान करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. महिलावर्ग, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद या रॅलीला लाभला.
या प्रसंगी उपस्थित सर्वांनी शंभर टक्के मतदान साध्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागरूकता वाढवून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.


