‘प्रोजेक्ट वीर गाथा ५.०’ मध्ये महाराष्ट्राची बाजी
देशातील सुपर १०० विजेत्यांत सर्वाधिक १९ विद्यार्थी महाराष्ट्राचे
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संरक्षण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि मायगव्ह (MyGov) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रोजेक्ट वीर गाथा ५.०’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. देशभरातून निवडल्या गेलेल्या ‘सुपर १००’ विजेत्यांमध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक १९ विद्यार्थी विजेते ठरले असून, त्यामध्ये १४ मुली आणि ५ मुलांचा समावेश आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत २०२१ साली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करणे आणि शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या पराक्रमाची ओळख करून देणे हा आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कथा, कविता, निबंध, चित्रकला आदी माध्यमांतून भारतीय सैन्यदलातील शूर जवानांचे शौर्य प्रभावीपणे मांडले.
यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता, देशप्रेम आणि सखोल अभ्यासाच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर आपली छाप उमटवली आहे. या यशामुळे राज्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेचा गौरव वाढला असून, भविष्यातील पिढीला राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.


