शहरी गतिशीलता आणि जलवाहतुकीवर फडणवीस–उबर सीईओ यांच्यात चर्चा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उबरचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Mr. Andrew Macdonald) यांच्यात महाराष्ट्रातील शहरी वाहतूक व्यवस्थेच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत जलवाहतूक, उबर बोट्स, शहरी गतिशीलतेतील उदयोन्मुख जागतिक प्रवाह, तसेच शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतूक उपायांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या माध्यमातून प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि कार्यक्षम कसा करता येईल, यावरही यावेळी चर्चा झाली. वेगाने वाढणाऱ्या महाराष्ट्रातील महानगरे आणि स्मार्ट शहरांमध्ये आधुनिक मोबिलिटी सोल्युशन्स राबवण्याच्या दृष्टीने उबरसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या अनुभवाचा उपयोग होऊ शकतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
अशा संवादांमुळे महाराष्ट्रात भविष्यसज्ज, सर्वसमावेशक आणि कार्यक्षम मोबिलिटी परिसंस्था उभारण्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतात. विशेषतः शहरी भागातील वाहतूक कोंडी कमी करणे, पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देणे आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी हे सहकार्य महत्त्वाचे ठरणार असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.


