शाळेच्या व्हॅनमध्ये चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

0
50
लोणेरेतील अत्याचार प्रकरणावर संताप; आरोपीला फाशीची मागणी, बंदचा इशारा
लोणेरेतील अत्याचार प्रकरणावर संताप; आरोपीला फाशीची मागणी, बंदचा इशारा

शाळेच्या व्हॅनमध्ये चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

बदलापूर, ता. २२ : बदलापूर शहरात पुन्हा एकदा अत्यंत धक्कादायक लैंगिक अत्याचाराची घटना घडली असून, खासगी इंग्रजी शाळेच्या व्हॅनमध्ये चार वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून, संबंधित स्कूल व्हॅनचालकानेच हा कृत्य केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पीडित मुलगी शिशुवर्गात शिकत असून ती दररोज शाळेत ये-जा करण्यासाठी याच व्हॅनचा वापर करत होती. नेहमी दुपारी सुमारे एक वाजता घरी पोहोचणारी ही मुलगी घटनेच्या दिवशी सुमारे एक तास उशिरा, म्हणजे दोन वाजण्याच्या सुमारास घरी आली. व्हॅनमधून उतरताना ती नीट चालू शकत नसल्याचे आईच्या लक्षात आले. संशय आल्यावर आईने विचारणा केली असता, मुलीने रडत-रडत आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

प्रकार समजताच आईने तातडीने मुलीला घेऊन बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी व्हॅनचालकाला ताब्यात घेतले. संबंधित व्हॅनमध्ये कोणतीही महिला मदतनीस नसल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

या घटनेनंतर बदलापूर परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांनी अंबरनाथ तालुक्यातील शिक्षण विभागावर गंभीर आरोप केले असून, शाळांची अधिकृत नोंदणी, सुरक्षा व्यवस्था, स्कूल व्हॅनची तपासणी तसेच चालक व कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे म्हटले आहे. नियमांचे काटेकोर पालन न झाल्यामुळेच अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. याप्रकरणी शिक्षण विभागाला जाब विचारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन संबंधित स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न केला. दीड वर्षांपूर्वी बदलापुरातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण उजेडात आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाण्याच्या आवारातच निषेध व्यक्त केला.

या घटनेमुळे बदलापूरमध्ये बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शाळा प्रशासन, वाहतूक व्यवस्था आणि संबंधित यंत्रणांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here