रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक: ६३३ अर्ज वैध

0
140
रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक: ६३३ अर्ज वैध
रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक: ६३३ अर्ज वैध

रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक: ६३३ अर्ज वैध; २७ जानेवारीला चित्र स्पष्ट होणार

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये पूर्ण झाली आहे. या छाननीत जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी दाखल झालेल्या एकूण २२४ अर्जांपैकी २०२ अर्ज वैध ठरले असून पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी दाखल ४४४ अर्जांपैकी ४३१ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात ५६ गट व ११२ गणांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, ५ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ ते २१ जानेवारी या कालावधीत पार पडली होती. मुदतीअंती जिल्हा परिषदेसाठी २२६ अर्ज तर पंचायत समितीसाठी ४४४ अर्ज दाखल झाले होते.

अर्ज छाननीदरम्यान काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले. अशा उमेदवारांचा एक अर्ज ग्राह्य धरून उर्वरित अर्ज अवैध ठरविण्यात आले. तसेच अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसणे अथवा तांत्रिक त्रुटी असल्याने काही उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

यामुळे आता जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी एकूण २०२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यात १०७ पुरुष आणि ९५ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी ४३१ उमेदवार निवडणूक लढविणार असून त्यात २४३ पुरुष आणि १८८ महिला उमेदवार आहेत.

दरम्यान, २५ जानेवारी रोजी रविवार आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची शासकीय सुटी असल्याने उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. त्या दिवशी किती उमेदवार माघार घेणार आणि अंतिम निवडणूक रिंगण कसे असेल, हे स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here