निवडणुकीआधीच निकाल ठरला!
महायुतीचे ११ उमेदवार बिनविरोध; नितेश राणेंचा विरोधकांना मोठा धक्का
निवडणुका होण्याआधीच निकाल जाहीर झाल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. भाजप नेते व पालकमंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना मोठा धक्का देत भाजप–शिवसेना महायुतीचे ११ उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे पाच तर पंचायत समितीचे सहा उमेदवार समाविष्ट आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या महायुतीने निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच आपली ताकद दाखवत विरोधकांना चक्रावून सोडले आहे. खारेपाटणमधून प्राची इस्वलकर (भाजप), बांदामधून प्रमोद कामत (भाजप), जानवलीतून रुहिता तांबे (शिवसेना), पडेलमधून सुयोगी घाडी (भाजप) आणि बापर्डेमधून अवनी तेली (भाजप) हे जिल्हा परिषद सदस्य
बिनविरोध निवडून आले आहेत.
त्याचप्रमाणे पंचायत समितीमध्ये वरवडेमधून सोनू सावंत (भाजप), पडेलमधून अंकुश ठुकरूल (भाजप), नाडणमधून गणेश राणे (भाजप), बापर्डेमधून संजना लाड (भाजप), कोकीसरेमधून साधना नकासे (भाजप) आणि बिडवाडीमधून संजना राणे (भाजप) हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
या निकालानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी जिल्ह्यात महाविकास आघाडी संपल्याचा दावा केला आहे. दरम्यान, एकापाठोपाठ एक उबाठा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
उबाठाचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी गंभीर आरोप करत आमच्या उमेदवारांना पैशांचे आमिष दाखवून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा दावा केला आहे.
यावर प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांनी, काम कोण करणार हे जनतेला माहीत असल्यामुळेच उमेदवारांनी स्वेच्छेने अर्ज मागे घेतल्याचे म्हटले आहे. मात्र, या संपूर्ण घडामोडींमध्ये उबाठाचे वरिष्ठ नेते मात्र सुशेगाद दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता उरलेले उमेदवार आपली उमेदवारी कायम ठेवतात की महायुतीकडून शिवसेना युबीटीला आणखी धक्के दिले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, आगामी निवडणुकांत महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.


