उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर एकमत

0
112
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर एकमत
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर एकमत

उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर एकमत

मुंबई l प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्याने हादरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाला सावरण्यासाठी स्व. अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद व पक्षाचे अध्यक्षपद सोपवण्याचा निर्णय घेतला असून शनिवारी होणा-या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे उद्याच सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून एका छोट्याखानी सोहळ्यात शपथविधी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.

अजितदादांना काल अखेरचा निरोप दिल्यानंतर राजकीय घडामोडीला वेग आला आहे. अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काल रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे सर्वांनी आज त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी नेते यावेळी उपस्थित होते. सुमारे दीड तास चाललेल्या या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी, सुनेत्रा पवार यांच्या किंवा अन्य कोणत्याही नावाबाबत आज चर्चा झाली नाही, असा दावा करतानाच सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी घ्यावी अशी सर्वांचीच इच्छा असल्याचे सांगितले.

आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि विधिमंडळाचे नेतेपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होते. त्याचा निर्णय आम्हाला करावा लागणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये याबाबत निर्णय करायचा आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद सोपवले जाणार का? या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल म्हणाले की ‘सुनेत्रा वहिनी पवार नावाची चर्चा आज झाली नाही, मात्र आमच्याही मनात ते आहे. आमची स्व:ताची सुद्धा भावना तशी आहे. मात्र अजूनही राजकीय शोक आहे, घरी काही धार्मिक विधी सुरू आहेत. आम्हाला याबाबत सुनेत्रा वहिनींशीही बोलावे लागेल, पार्थ पवार, जय पवार यांच्याशीही बोलावे लागेल. घरचे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू. लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे. जनतेची भावना आणि सर्वांच्या भावनांच्या अनुरूप निर्णय होणार आहे. आमचा कुणाचाही त्यांच्या नावाला विरोध नाही, पण आम्हाला त्यांच्याशी बोलावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनीही सुनेत्रा पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल, असे जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here