रायगड जिल्हा नेत्रदानात अग्रेसर !
रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नेत्रदानाबाबत सकारात्मक जनजागृती होत असून मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरवर्षी सुमारे ३०० नागरिक नेत्रदानाचा संकल्प करीत असून, त्यामुळे प्रत्यक्ष नेत्रदानाचे प्रमाणही वाढले आहे. १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२५ या पावणेपाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण १४७ जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले असून त्यातून २९४ नेत्रबुबुळांचे संकलन करण्यात आले आहे.
या कालावधीत जिल्हा रुग्णालयामार्फत ४४ जणांच्या नेत्रदानातून ८८ नेत्रबुबुळे संकलित करण्यात आली. शंकर आय बँकेत ८ नेत्रदानांमधून १६ नेत्रबुबुळे, तर लक्ष्मी आय बँकेत ८० जणांच्या नेत्रदानातून १९० नेत्रबुबुळे संकलित करण्यात आली आहेत. संकलित नेत्रबुबुळांपैकी ४१ अंध व्यक्तींवर बुबुळ रोपण शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टी देण्यात आली, तर ११६ नेत्रपटल संशोधनासाठी पाठविण्यात आली आहेत. उर्वरित ६ नेत्रबुबुळे इतर संस्थांकडे पाठविण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्यातील नेत्रदान चळवळ अधिक व्यापक होत असून, या कार्यातून अनेक गरजू रुग्णांना दृष्टी मिळत असल्याने ही चळवळ समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. भविष्यात रायगड जिल्हा नेत्रदान चळवळीत आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


