मतमोजणी व आंगणेवाडी जत्रा एकाच दिवशी

0
23
आंगणेवाडीत श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव ९–१० फेब्रुवारीला
आंगणेवाडीत श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव ९–१० फेब्रुवारीला

मतमोजणी व आंगणेवाडी जत्रा एकाच दिवशी

प्रशासनाला सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन

सिंधुदुर्ग l प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून, त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या मतदान व मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार यापूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, ७ फेब्रुवारीऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

दरम्यान, मतमोजणीच्या दिवशीच म्हणजे ९ फेब्रुवारी रोजी कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री. भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सवही आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी लोकशाहीचा उत्सव आणि श्रद्धेचा महोत्सव साजरा होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी संयम, शिस्त आणि सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी संयुक्त निवेदनाद्वारे केले आहे.

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षा, वाहतूक आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन आवश्यक असते. त्याचबरोबर आंगणेवाडी जत्रेसाठी राज्याच्या विविध भागांतून तसेच जिल्ह्याबाहेरून लाखो भाविक सिंधुदुर्गात दाखल होतात. त्यामुळे रस्ते, वाहतूक मार्ग, सार्वजनिक सेवा आणि सुरक्षेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.

या अनुषंगाने नागरिकांनी व भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन

करावे अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात अनधिकृत गर्दी करू नये, कोणत्याही अफवा अथवा अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

नागरिकांचे सहकार्य लाभल्यास मतमोजणी प्रक्रिया आणि आंगणेवाडी जत्रोत्सव शांततेत व सुरळीत पार पडेल, असा विश्वास जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महापालिका प्रशासन व संबंधित यंत्रणा सज्ज आहेत. महापौर व उपमहापौर पदासाठी कोणाची वर्णी लागणार, याबाबत शहरात उत्सुकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here