‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–२०२६’
मुंबई व उपनगरात जिल्हास्तरीय कार्यशाळांचे आयोजन
मुंबई l प्रतिनिधी
राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राची उत्पादकता, कार्यक्षमता आणि निर्यातक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–२०२६’ अंतर्गत मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून स्थानिक उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न करण्यात येत आहे.
राज्यात अनेक एमएसएमई उद्योग दर्जेदार उत्पादने तयार करत असले तरी निर्यात प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, नियम, कागदपत्रांची गुंतागुंत आणि बाजारपेठेच्या मर्यादा यांमुळे ते जागतिक स्तरावर पोहोचू शकत नाहीत. या अडचणी दूर करून उद्योजकांना प्रत्यक्ष निर्यातीसाठी सक्षम करण्यासाठी या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळांमध्ये उद्योगांची उत्पादकता कशी वाढवावी, उत्पादनांना निर्यातयोग्य स्वरूप कसे द्यावे, निर्यातीसाठी आवश्यक नोंदण्या, प्रमाणपत्रे, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग यासह केंद्र व राज्य सरकारच्या विविध निर्यात प्रोत्साहन योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील मागणी, नवीन ट्रेंड आणि संधी याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळांमध्ये ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) या संकल्पनेवर विशेष भर देण्यात येणार आहे. या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची ओळख करून देऊन त्या उत्पादनांचा दर्जा, विपणन आणि ब्रँड मूल्य वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे स्थानिक उद्योगांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळून रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
मुंबई आणि मुंबई उपनगर हे उद्योग, व्यापार आणि निर्यातीचे प्रमुख केंद्र असल्याने येथे कार्यरत असलेल्या मोठ्या संख्येतील एमएसएमई उद्योजकांसाठी स्वतंत्र कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी कार्यशाळा २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एमएसएमई विकास व सुविधा कार्यालय, साकीनाका येथे होणार आहे. तर मुंबई शहर जिल्ह्यासाठी कार्यशाळा ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आली आहे.
नोंदणीसाठी [email protected] या ई-मेलवर किंवा https://forms.gle/nmB97ostLrz9e3No9 या लिंकद्वारे अर्ज करून सहभाग निश्चित करता येईल, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे राज्यातील एमएसएमई उद्योगांना निर्यातीसाठी आवश्यक आत्मविश्वास, ज्ञान आणि संधी उपलब्ध होऊन ‘स्थानिकातून जागतिक’ या संकल्पनेला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


