सिंधुदुर्ग जिल्हा परिषद रणसंग्राम

0
72
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद रणसंग्राम
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद रणसंग्राम

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद रणसंग्राम

राणे विरुद्ध ठाकरे संघर्षात ‘महायुती’ की ‘महाविकास आघाडी’?

कोकणच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या माध्यमातून जिल्ह्यावरची आपली पकड कायम राखण्याचा प्रयत्न सुरू केला असून, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने जिल्ह्यात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. राणे कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या सिंधुदुर्गात ठाकरे गट कितपत आव्हान उभे करतो, यावर जिल्ह्याचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागांसाठी ही निवडणूक होत असून, यासाठी जिल्हाभरातून तब्बल ४१२ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठीही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीच्या जागावाटपानुसार भाजप ३२, तर शिंदे गटाची शिवसेना १८ जागांवर निवडणूक

लढवत आहे. याउलट महाविकास आघाडीने सर्व ५० जागांवर उमेदवार उभे करत थेट मुकाबला उभा केला आहे.

दरम्यान, काही जागांवर बिनविरोध निवडी झाल्याने भाजपचा ‘बिनविरोध पॅटर्न’ चर्चेत आला आहे. खारेपाटणमधून भाजपच्या प्राची इस्वलकर, देवगड तालुक्यातील पडेलमधून सुयोगी रवींद्र घाडी, बापर्डेमधून अवनी अमोल तेली आणि बांदा मतदारसंघातून प्रमोद कामत हे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच जानवली जिल्हा परिषद गटातून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या रुहिता राजेश तांबे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समित्यांच्या ६ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, त्यामध्ये भाजपचे ५ आणि शिंदे गटाचा १ उमेदवार आहे.

सिंधुदुर्ग हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मूळ जिल्हा असून, राणे पिता-पुत्रांच्या राजकीय व्यूहरचनेमुळे भाजपने मतदानापूर्वीच आपला दबदबा निर्माण केल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात नितेश राणे (कणकवली – भाजप), निलेश राणे (कुडाळ –शिंदे गट) आणि दीपक केसरकर (सावंतवाडी – शिंदे गट) हे महत्त्वाचे चेहरे प्रचारात आघाडीवर आहेत.

गेल्या निवडणुकीतील संख्याबळ पाहता, तत्कालीन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला (आताचा भाजप) २७, अविभाजित शिवसेनेला १६, काँग्रेसला ६ तर भाजपला केवळ १ जागा मिळाली होती. त्यामुळे यावेळी सत्ता समीकरणात किती बदल होतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या निवडणुकीत काही कळीचे मुद्दे केंद्रस्थानी आहेत. सी-वर्ल्ड प्रकल्पाला होणारा विरोध आणि पर्यटनातून निर्माण होणाऱ्या रोजगाराचा प्रश्न, मुंबई-गोवा महामार्गासह कोकण रेल्वे व

रस्त्यांच्या निकृष्ट कामामुळे स्थानिकांचा वाढता संताप, राणे विरुद्ध ठाकरे ही अस्मितेची लढाई, काजू-आंबा बागायतदारांना मिळणारा अपुरा भाव व प्रक्रिया उद्योगांची कमतरता, ग्रामीण भागातील पाणीटंचाई आणि बिनविरोध निवडीचे राजकारण हे मुद्दे निकालावर प्रभाव टाकणार आहेत.

सध्या सिंधुदुर्गात ‘महायुती’ विरुद्ध ‘महाविकास आघाडी’ असा थेट सामना रंगला आहे. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिंदे गट महायुतीत एकत्र आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रचाराची धुरा सांभाळत ‘विकास’ हा मुख्य मुद्दा पुढे केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here