उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रितीसंगमवार स्व.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
कराड l प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील प्रितीसंगम येथे महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील,जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार प्रथमच कराड येथे आल्या असून, या दौऱ्यात त्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत त्यांना आदरांजली अर्पण केली.
यावेळी उपस्थितांना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाशी असलेले जिव्हाळ्याचे नातेही आठवले. स्व. अजित पवार हे वारंवार कराड येथे येऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करत असत, त्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आणि विचारांचा महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी राबवलेली विकासाची संकल्पना आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रितीसंगम येथे अभिवादन कार्यक्रम शांत व श्रद्धेय वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व नागरिकांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन केले. हा कार्यक्रम मूल्ये आणि नेतृत्वाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारा ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


