जनसागर एकत्र येण्याआधीच सत्ता आवळली

0
31
जनसागर एकत्र येण्याआधीच सत्ता आवळली
जनसागर एकत्र येण्याआधीच सत्ता आवळली

जनसागर एकत्र येण्याआधीच सत्ता आवळली

महाराष्ट्राने एकजूट केली तर डाव उलटू शकतो!

महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण करणाऱ्या अजितदादा पवार यांच्या निधनानंतर उसळलेल्या जनसागराने इशारा दिला की भावनांचा हा प्रवाह जर एकजुटीकडे वळला, तर महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलू शकते. याच पार्श्वभूमीवर पुढील घडामोडी अधिक निर्णायक ठरू लागल्या.

अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर जो अलोट जनसागर महाराष्ट्रभर उसळला तो केवळ शोक व्यक्त करणारा नव्हता तर तो एक सूचक इशाराही होता. आता हळूहळू सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे. हा जनसागर नेत्यांच्या छातीत थेट धडकणारा होता. गावोगाव, शहरोगरी, चुलीपाशी आणि चौकाचौकात एकच भावना दिसत होती की महाराष्ट्राने आपला खंबीर नेता गमावला आहे आणि ही हानी भरून न निघणारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच नव्हे तर भाजपमधीलही अनेक लोक या वास्तवाने अंतर्मुख झाले होते. सत्ता, डावपेच, आकडेमोड यापलीकडे जाऊन माणूस म्हणून, नेता म्हणून अजितदादांची उणीव सगळ्यांना जाणवत होती.

याच क्षणी सत्ताधाऱ्यांना खरी भीती वाटू लागली. कारण अजितदादांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली ही भावनिक लाट जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र आणणारी ठरली तर भाजपची महाराष्ट्रातील राजकीय ताकद निश्चितच कमकुवत होईल हे केंद्रातील नेतृत्वाच्या लक्षात आले होते. शरद पवार आणि अजित पवार या नावांभोवती पुन्हा एकदा भावनिक एकजूट निर्माण होण्याची शक्यता भाजपसाठी धोक्याची घंटा होती. हीच ती वेळ होती जेव्हा दिल्लीतील अमित शहा आणि मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू सरकली असे म्हणायला हरकत नाही.

या भीतीतूनच घाईघाईने हालचाली सुरू झाल्या. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला असावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात उघडपणे सुरू आहे. नाक दाबून तोंड उघडायला लावण्याच्या पद्धतीने निर्णय घ्यायला भाग पाडले गेले आणि क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पाडण्यात आला. शोकाकुल वातावरण असताना, जनतेच्या भावना शांत होण्याआधीच सत्ता सुरक्षित करण्यासाठी हा डाव खेळला गेला आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच डाव आपल्या मुठीत ठेवला.

पण हा डाव कितीही चतुर असला तरी जनतेच्या मनातील प्रश्न आता अधिक तीव्र होत आहेत. एवढी घाई का होती, एवढी भीती का वाटत होती आणि नेमकं कोणापासून ही सत्ता वाचवली जात होती हे प्रश्न सामान्य माणूस विचारू लागला आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली सहानुभूती, करुणा आणि आदर ही भावना केवळ एका नेत्यापुरती मर्यादित नव्हती तर ती संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेली होती. त्या भावनेला दाबून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न झाला आहे अशीच धारणा बळावत चालली आहे.

आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रासमोर एक स्पष्ट पर्याय उभा आहे. जर जनता खंबीरपणे उभी राहिली, सत्तेच्या या खेळीला ओळखून विरोध केला.

आणि अजितदादा व शरद पवार या दोघांच्या विचारांना एकत्र आणण्याची मागणी केली तर भाजपला महाराष्ट्रात थोपवून धरता येऊ शकते. हा केवळ पक्षांचा प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, लोकशाहीचा आणि भविष्यातील राजकारणाचा प्रश्न आहे. भावनिक लाट दाबून सत्ता मिळवता येईल पण जनतेचा विश्वास कायमचा गमावला तर सत्ता फार काळ टिकत नाही हे इतिहासाने वारंवार दाखवून दिले आहे.

आज गरज आहे ती महाराष्ट्राने शांतपणे पण ठामपणे भूमिका घेण्याची. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीला फक्त सत्ता भरू शकत नाही तर विचारांची एकजूट, जनतेची ताकद आणि प्रामाणिक राजकारणच ती भरू शकते. शरद पवार आणि अजित पवार यांची एकत्रित ताकद जर पुन्हा उभी राहिली तर भाजपचा हा मोठा डाव निष्फळ ठरू शकतो. महाराष्ट्रासाठी, सामान्य माणसासाठी आणि लोकशाहीसाठी हेच योग्य आणि गरजेचे आहे अशी भावना आता अधिकाधिक जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here