ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६

0
35
ग्रामीण–कृषी–सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६
ग्रामीण–कृषी–सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६

ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६

रत्नागिरी l प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. या तिन्ही क्षेत्रांचे साहित्यिक, वैचारिक आणि अनुभवाधारित दर्शन घडवणारे ग्रामीण–कृषी–सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६ हे मांडकी–पालवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे दि. १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था यांच्या वतीने संस्थेच्या प्रशस्त क्रीडांगणावर हे भव्य संमेलन संपन्न होणार आहे.

या संमेलनात ग्रामीण साहित्य, कृषी सुधारणा, सहकार चळवळ आणि कोकणातील सांस्कृतिक वारसा यावर आधारित परिसंवाद, कवी संमेलन, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, मुलाखती तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांचे प्रश्न, सहकारातील मूल्ये आणि साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे,

स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. संजय भावे (कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) तर प्रमुख कार्यवाह म्हणून डॉ. निखिल चोरगे काम पाहणार आहेत. संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे असून, राज्यभरातील नामवंत साहित्यिक, कृषी तज्ज्ञ आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर या संमेलनात सहभागी होणार आहेत.

या संमेलनाच्या लोगोचे अनावरण आज कवी केशवसुत स्मारक, मालगुंड (ता. संगमेश्वर) येथे पार पडले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा रत्नागिरीच्या अध्यक्षा व रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करण्यात आले. ग्रामीण, कृषी आणि सहकार या तीन विषयांवर आधारित साहित्य संमेलन महाराष्ट्रात प्रथमच आयोजित होत असल्याने हा उपक्रम ऐतिहासिक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी संयोजन समितीच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.

या कार्यक्रमास मालगुंडच्या सरपंच सौ. श्वेता थेऊर, संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, नियोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह निखिल चोरगे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण तसेच कवी केशवसुत स्मारकाच्या कार्यवाह नलिनी खेर उपस्थित होत्या.

संस्थेच्या संचालिका व स्मरणिका संपादिका अंजलीताई चोरगे यांनीही महाराष्ट्रासह रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमींनी या ऐतिहासिक संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. रसिकांसाठी एक महत्त्वाची वैचारिक व सांस्कृतिक पर्वणी ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here