‘संधिकाली या अशा’ – एकपात्री बहुरूपीचा दणदणीत शुभारंभ!

0
46
‘संधिकाली या अशा’ – एकपात्री बहुरूपीचा दणदणीत शुभारंभ!
‘संधिकाली या अशा’ – एकपात्री बहुरूपीचा दणदणीत शुभारंभ!

‘संधिकाली या अशा’ – एकपात्री बहुरूपीचा दणदणीत शुभारंभ!

मुंबई प्रतिनिधी

मुंबई : श्री सिद्धिविनायक प्रस्तुत व रसिकांकिता थिएटर्स, मुंबई निर्मित “संधिकाली या अशा” या एकपात्री बहुरूपी कलाविष्काराचा शुभारंभाचा प्रयोग दि. ३१ जानेवारी रोजी प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली येथे रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात रंगला.

आपल्या सगळ्यांच्या घरातली, आयुष्यातलीच ही कथा… शालेय जीवनापासून सुरू होणारी धावपळ – शाळा, कॉलेज, नोकरी, लग्न, संसार, मुलंबाळं… आणि मग अचानक निवृत्ती! पुढे काय? बदलत्या काळात स्वतःला जुळवून घेताना ‘माधव कुलकर्णी’ या पात्राचा प्रवास अत्यंत हलक्याफुलक्या, विनोदी आणि हृदयस्पर्शी शैलीत या प्रयोगातून उलगडतो.

हा कलाविष्कार केवळ मनोरंजन नाही, तर प्रत्येकाला अंतर्मुख करणारा “सुखाचा मंत्र” देणारा अनुभव आहे, असे निर्माते व सादरकर्ते राजन काजरोळकर यांनी सांगितले.

या एकपात्रीचे लेखन व दिग्दर्शन विनीता पिंपळखरे यांनी केले असून, एका कलाकाराने साकारलेली अनेकविध पात्रे हे या प्रयोगाचे खास वैशिष्ट्य आहे. प्रत्येक पात्राची वेगळी देहबोली, आवाजातील चढ-उतार, संवादफेक आणि बेअरिंग

यासाठी राजन काजरोळकर यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या प्रभावी सादरीकरणातून ठळकपणे जाणवते. त्यांच्या सहजसुंदर अभिनयाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

दिग्दर्शिका विनीता पिंपळखरे यांनी कल्पक आणि सिद्धहस्त लेखनातून विविध पात्रांना एकाच भावमालिकेत गुंफत कथेची प्रभावी मांडणी केली आहे. पहिल्याच प्रयोगानंतर विविध ठिकाणाहून या कलाविष्कारासाठी निमंत्रणे येत असल्याची माहिती राजन काजरोळकर यांनी दिली.

मनोरंजनासोबत विचार करायला भाग पाडणारा आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टी देणारा हा प्रयोग सर्वांनी आवर्जून पाहावा असा आहे.

प्रयोगासाठी संपर्क : ९८२०९२३८९७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here