कोकणातील कातळशिल्पांसाठी १४.६२ कोटींची तरतूद

0
50
कोकणातील कातळशिल्पांसाठी १४.६२ कोटींची तरतूद
कोकणातील कातळशिल्पांसाठी १४.६२ कोटींची तरतूद

कोकणातील कातळशिल्पांसाठी १४.६२ कोटींची तरतूद

कोकण किनारपट्टीवरील हजारो वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांचा जागतिक वारसा दर्जासाठीचा प्रवास आता अधिक वेग घेणार आहे. पुरातत्त्वीय, सांस्कृतिक आणि जैविक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या वारशाचे शास्त्रोक्त संशोधन, दस्तऐवजीकरण आणि संवर्धन सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाने ‘जागतिक वारसा कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई l प्रतिनिधी

कोकणातील प्राचीन कातळशिल्पांचे शास्त्रोक्त संशोधन आणि जागतिक वारसा नामांकन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘जागतिक वारसा कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी १४ कोटी ६२ लाख ३२ हजार ६७१ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कातळशिल्पांचे पुरातत्त्वीय, सांस्कृतिक आणि जैविक महत्त्व जागतिक स्तरावर अधोरेखित केले जाणार आहे.

केंद्र शासनाने कोकणातील कातळशिल्पांचा प्रस्ताव युनेस्कोकडे यापूर्वीच सादर केला आहे. त्या प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य शासनाने २०२६ ते २०२९ या कालावधीत कार्यरत राहणारा ‘जागतिक वारसा कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कक्षाच्या दोन शाखा मुंबई आणि रत्नागिरी येथे असणार आहेत .

१४.६२ कोटींची सविस्तर तरतूद

या प्रकल्पासाठी एकूण १४ कोटी ६२ लाख ३२ हजार ६७१ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी

वैज्ञानिक चाचण्या व सहकार्य उपक्रमांसाठी ६ कोटी ३८ लाख २२ हजार रुपये, मनुष्यबळासाठी २ कोटी ९४ लाख ६६ हजार ७९२ रुपये, उपकरणे व पायाभूत सुविधांसाठी २ कोटी ६० लाख ५० हजार रुपये आणि प्रशासकीय अधिभारासाठी १ कोटी ३२ लाख ९३ हजार ८७९ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

त्नागिरी शाखेकडे सर्वेक्षण व जनसहभागाची जबाबदारी

रत्नागिरी शाखा क्षेत्रीय कामकाज आणि जनसहभागावर लक्ष केंद्रित करणार आहे. कातळशिल्पांचे प्रत्यक्ष स्थळी जाऊन शास्त्रोक्त सर्वेक्षण, जागतिक स्थान निर्देशांक प्रणालीवर आधारित नकाशांकन, मानवविरहित उड्डाण यंत्राद्वारे छायाचित्रण व दृकश्राव्य दस्तऐवजीकरण ही कामे या शाखेतर्फे केली जाणार आहेत.

स्थानिक परंपरा, लोककथा, स्थाननावे यांचा अभ्यास व संकलन करून कातळशिल्पांचा सांस्कृतिक संदर्भ

नोंदवला जाईल. नैसर्गिक क्षरण किंवा मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या नुकसानीचे मूल्यमापन करून संवर्धनासाठी आवश्यक शिफारशी देण्याची जबाबदारीही या शाखेकडे असेल. स्थानिक समुदायांशी संवाद साधून वारसा जतनासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

मुंबई शाखेकडे संशोधन व समन्वयाची धुरा

मुंबई शाखा संशोधन आणि समन्वयाची जबाबदारी सांभाळणार आहे. भारतीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कातळशिल्पांवरील उपलब्ध साहित्याचा सखोल अभ्यास, ऐतिहासिक नकाशे व उपग्रह प्रतिमांच्या साहाय्याने तांत्रिक विश्लेषण आणि कातळशिल्पांचा अद्ययावत माहितीकोश तयार करणे ही प्रमुख कामे असतील.

युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वेक्षण, नोंदणी आणि संवर्धनासाठी आवश्यक निकष निश्चित केले जातील. तसेच संशोधनपर लेखन, जागतिक परिषदांसाठी सादरीकरणे आणि धोरणात्मक अहवाल तयार करण्याचे कामही मुंबई शाखेकडे सोपविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here