
राज्यातील ९०० दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द
२८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत नोंदणी अनिवार्य -तुकाराम मुंढे.
मुंबई l प्रतिनिधी
राज्यात दिव्यांग व्यक्ती अधिनियमांतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे ९०० संस्थांची नोंदणी विविध कारणांमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे. यांनी दिली आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या सर्व संस्थांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. राज्यात साधारण दोन हजारांहून अधिक संस्था दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत. यापैकी नियमांचे पालन न करणाऱ्या किंवा आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असलेल्या सुमारे ९०० संस्थांना अपात्र ठरवत विभागाने त्यांच्यावर कारवाई करून नोंदणी रद्द केली आहे.
सचिव मुंढे यांनी स्पष्ट केले की, पात्र संस्थांनी २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत https://divyangkalyan.maharashtra.gov.in/
या अधिकृत संकेतस्थळावर आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीत नोंदणी न केल्यास संबंधित संस्थांवर अधिनियमातील कलम ९१ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण आणि सेवा व्यवस्थेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

