डिझेल खरेदीत हस्तक्षेप सहन करणार नाही – मंत्री प्रताप सरनाईक

0
32
डिझेल खरेदीत हस्तक्षेप सहन करणार नाही - मंत्री प्रताप सरनाईक
डिझेल खरेदीत हस्तक्षेप सहन करणार नाही - मंत्री प्रताप सरनाईक

डिझेल खरेदीत हस्तक्षेप सहन करणार नाही – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई l प्रतिनिधी

प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या डिझेल खरेदी प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देत निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने राबवली जाईल, असे ठामपणे सांगितले. माध्यमांतून चुकीच्या बातम्या पसरवून किंवा न्यायालयीन मार्गाने विलंब घडवून आणण्याचे प्रयत्न संबंधित कंपन्यांनी थांबवावेत, असा सज्जड दम त्यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे घाऊक ग्राहक म्हणून संबंधित कंपन्यांकडून प्रति लिटर २ रुपये ७० पैसे सवलत घेत होते. मंत्री सरनाईक यांनी कंपनीची बैठक घेऊन ही सवलत ३० पैशांनी वाढवून ३ रुपये करण्यात यश मिळवले. यामुळे महामंडळाला वर्षाकाठी सुमारे १० ते १२ कोटी रुपयांची बचत होऊ लागली आहे. मात्र इतर राज्य परिवहन महामंडळांना अधिक सवलत मिळत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. 

मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशला ४ रुपयांपेक्षा जास्त, तर आंध्र प्रदेश परिवहन महामंडळाला तब्बल ५ रुपये ५० पैसे सवलत मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सध्या एसटी महामंडळावर सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा असून वर्षाकाठी डिझेल खरेदीवर अंदाजे ३,४०० कोटी रुपये खर्च होतात. लवकरच ८ हजार नव्या डिझेल बसेस ताफ्यात दाखल होणार असल्याने हा खर्च सुमारे ४,७०० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डिझेल दरात केवळ १ रुपयांची घट झाली तरी वर्षाकाठी ५० ते ५५ कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

एसटीच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here