मराठी भाषा गौरव दिनी ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन
पुणे l प्रतिनिधी
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करणार आहे. हा प्रकाशन सोहळा नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
मंडळाच्या स्थापनेपासून ‘पुस्तक प्रकाशन’ हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले असून गंभीर, वैचारिक, संशोधनपर आणि मौलिक विषयांवरील ग्रंथनिर्मिती सातत्याने केली जात आहे. खाजगी प्रकाशकांकडून सहसा प्रकाशित न होणारे उच्च दर्जाचे संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित करण्याची महत्त्वाची जबाबदारी मंडळ पार पाडत आहे.
आजवर मंडळाने ७३० हून अधिक ग्रंथ प्रकाशित केले असून दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नव्या ग्रंथांचे करण्याची परंपरा जपली आहे. यंदाही विविध विषयांवरील ४२ नव्या ग्रंथांच्या प्रकाशनामुळे मराठी साहित्यविश्वात भर पडणार आहे.
मंडळाचे सर्व ग्रंथ https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच शासकीय मुद्रणालय आणि खाजगी वितरकांकडेही अत्यल्प दरात हे ग्रंथ उपलब्ध आहेत. वाचकांच्या भरघोस प्रतिसादामुळे अनेक ग्रंथांचे पुनर्मुद्रण करावे लागत असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित या प्रकाशन सोहळ्यामुळे मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.


