डोंबिवली–ठाणे बससेवा ४ मार्चपासून

0
27
डोंबिवली–ठाणे बससेवा ४ मार्चपासून
डोंबिवली–ठाणे बससेवा ४ मार्चपासून

डोंबिवली–ठाणे बससेवा ४ मार्चपासून

मुंबई l प्रतिनिधी

डोंबिवली पश्चिम येथून ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ४ मार्च २०२६ पासून नवीन बससेवा सुरू करण्यात येणार आहे. डोंबिवली परिसरातून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल रेल्वेमधील प्रचंड गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना पर्यायी वाहतूक सुविधा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डोंबिवली–ठाणे मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापारी वर्ग प्रवास करतात. मात्र लोकल रेल्वेतील प्रचंड गर्दीमुळे प्रवास धोकादायक बनत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी बारावीच्या परीक्षेसाठी जात असताना १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मुंब्रा–कळवा दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर लोकलमधील गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला.

या पार्श्वभूमीवर कल्याण -डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४ मार्च पासून डोंबिवली पश्चिम–ठाणे ही नवीन बससेवा सुरू केली जात आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात ४० आसनी अशा दोन बस या मार्गावर धावणार आहेत. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रत्येक बस चार फेऱ्या मारणार असून एकूण आठ फेऱ्या दररोज होणार आहेत. ही बससेवा मोठागाव सर्कल येथून सुरू होऊन मानकोली–माजिवाडा चौक मार्गे घोडबंदर रोडपर्यंत जाणार आहे.

या बससेवेच्या माध्यमातून डोंबिवली आणि ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः पश्चिम डोंबिवली परिसरातील प्रवाशांना या सेवेचा अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here